मुंबई : नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा! १ ते ३ डिसेंबर दरम्यान टोयोटा, होंडा आणि जेएसडब्लू मोटर्स या तीन कंपन्या आपापल्या दमदार गाड्या सादर करणार आहेत. जाणून घ्या तुमच्या बजेट आणि गरजेनुसार कोणती गाडी बेस्ट ठरेल.
वर्षाचा शेवटचा महिना भारतीय कारप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. डिसेंबरच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत, म्हणजेच १ ते ३ डिसेंबरदरम्यान तीन प्रमुख कंपन्या आपापल्या बहुप्रतिक्षित एसयूव्ही (SUV) गाड्यांवरून पडदा उचलणार आहेत. यामध्ये टोयोटा, होंडा आणि भारतीय प्रवासी वाहन बाजारात पाऊल ठेवणाऱ्या जेएसडब्लू (JSW) मोटर्सचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, या तिन्ही गाड्या वेगवेगळ्या इंधन पर्यायांसह येत आहेत. एक पारंपरिक डिझेल-पेट्रोलवर, दुसरी पूर्णपणे इलेक्ट्रिक, तर तिसरी प्लग-इन हायब्रिड असेल.
बातमीतील महत्त्वाचे मुद्दे (Highlights):
१ डिसेंबर: नव्या पिढीच्या ‘टोयोटा फॉर्च्यूनर’चे जागतिक अनावरण.
२ डिसेंबर: होंडाची पहिली इलेक्ट्रिक SUV ‘अल्फा’ भारतात सादर होणार.
३ डिसेंबर: महाराष्ट्रात तयार होणारी जेएसडब्लूची ‘कॉम्बॅट’ SUV येणार.
१ डिसेंबर:
नव्या ‘टोयोटा फॉर्च्यूनर’चा नवा अवतार
दणकट SUV सेगमेंटमध्ये वर्षानुवर्षे राज्य करणाऱ्या टोयोटा फॉर्च्यूनरचे नवे रूप १ डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर सादर होणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या टेस्टिंग फोटोंवरून नवीन फॉर्च्यूनरचा लूक आणि रुबाब पूर्वीपेक्षा अधिक दमदार असल्याचे दिसत आहे. ही गाडी ‘IMV लॅडर-फ्रेम’ प्लॅटफॉर्मवरच आधारित असेल, जी खराब रस्त्यांसाठी ओळखली जाते. यात २.७ लिटर पेट्रोल आणि २.८ लिटर डिझेल (माइल्ड हायब्रिडसह) इंजिन पर्याय कायम राहतील. जागतिक सादरीकरणानंतर पुढील वर्षी ती भारतात लॉन्च होईल.

२ डिसेंबर:
होंडाची पहिली इलेक्ट्रिक SUV ‘अल्फा’
इलेक्ट्रिक वाहनांच्या स्पर्धेत उतरत होंडा कंपनी २ डिसेंबर रोजी आपली पहिली इलेक्ट्रिक SUV ‘होंडा अल्फा ईव्ही’ (Honda Alpha EV) भारतात सादर करणार आहे. कंपनीने शेअर केलेल्या झलकवरून तिचे डिझाईन ‘० अल्फा’ कॉन्सेप्टसारखेच आधुनिक आहे. यात मोठी टचस्क्रीन, व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ आणि लेव्हल-२ ADAS सारखे फीचर्स मिळतील. ६५ ते ७५ kWh बॅटरी पॅकसह ही गाडी एका चार्जमध्ये ४०० ते ५०० किमी रेंज देऊ शकते. १५ ते २५ लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) रेंजमध्ये तिची थेट टक्कर महिंद्रा BE6, टाटा सिएरा EV आणि ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकशी होईल.
३ डिसेंबर:
महाराष्ट्रात तयार होणारी जेएसडब्लूची ‘कॉम्बॅट’ SUV
भारतीय कार मार्केटमध्ये एन्ट्री करणारी जेएसडब्लू मोटर्स ३ डिसेंबर रोजी आपली पहिली SUV ‘कॉम्बॅट’ (Combat) सादर करणार आहे. जागतिक बाजारातील ‘जेटूर टी२’ वर आधारित या गाडीचा लूक बॉक्सी आणि रांगडा आहे. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्पात या गाडीची निर्मिती होणार आहे.
पॉवर आणि रेंज: ही एक प्लग-इन हायब्रिड (PHEV) SUV असेल. यात १.५ लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसोबत दोन इलेक्ट्रिक मोटर्स दिल्या आहेत, ज्या एकत्रितपणे दमदार पॉवर निर्माण करतात. केवळ बॅटरीवर ही गाडी सुमारे ९० ते १०० किमी धावेल, तर फुल पेट्रोल टँक आणि पूर्ण चार्जिंगसह तिची एकूण रेंज १,१०० किमीपर्यंत असेल. संभाव्य किंमत ३० ते ४० लाख रुपयांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
वेगवान विशेष :
तुम्ही नेमकी कोणती गाडी निवडावी? (खरेदीदारांसाठी सल्ला)
जर तुम्ही सध्या नवीन गाडी घेण्याच्या विचारात असाल, तर तुमच्या गरजेनुसार निर्णय घेणे सोपे होईल:
शहरातील रोजचा प्रवास आणि कमी खर्च हवा असल्यास: होंडाची ‘अल्फा ईव्ही’ तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
लांबचा प्रवास आणि चार्जिंगचे टेन्शन नको असल्यास: जेएसडब्लू ‘कॉम्बॅट’ मधील प्लग-इन हायब्रिड तंत्रज्ञान तुमच्यासाठी बेस्ट आहे, कारण यात इलेक्ट्रिक आणि पेट्रोल दोन्ही फायदे मिळतात.
ऑफ-रोडिंग आणि मजबूत रिसेल व्हॅल्यू हवी असल्यास: नवीन टोयोटा फॉर्च्यूनरची वाट पाहणे फायदेशीर ठरेल.
