पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता ! हवामान विभागाची माहिती…
पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता ! हवामान विभागाची माहिती...

मुंबई : महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्याने उष्णतेमुळे नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. त्यामुळे कधी एकदाचा पाऊस येईल, अशी भावना नागरिकांची झाली आहे. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजासाठी महत्त्वाचे वृत्त आहे.
आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबई सह महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
गेला आठवडा भर मुंबईत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.आता हा जोर वाढणार असून पुढील दोन दिवस मुंबईला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर उर्वरित महाराष्ट्रात येत्या पाच दिवसात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या नंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता. नुकतेच विदर्भात मन्सूनचे आगमन झाले असून, विदर्भात ही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस राज्यावर दाखल झाल्यानंतर सहा दिवसांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. बुधवारी, मॉन्सूनची उत्तर सीमा पोरबंदर, भावनगर, खांडवा, गोंदिया, दुर्ग, भवानीपटना, कलिंगपट्टणम, बालुरघर आणि सुपौलमधून पुढे सरकली.
हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर काय म्हणतात ?
विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, येत्या ५ दिवसात राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या ३ दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
17 Jun; येत्या ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.
पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता.
त्यानंतरच्या 3 दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता.
मुंबई ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे.
– IMD pic.twitter.com/yYycL1q5vw— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 17, 2022
मुंबई आणि ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पाऊस होण्याची चिन्हे आहेत. अधिक माहितीसाठी हवामान विभागाकडून दिल्या जाणाऱ्या विविध अपडेटसकडे लक्ष ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसात पाऊस संपूर्ण राज्य व्यापणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कृषिमंत्री दादा भुसे म्हणतात ? पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नका
राज्यात आतापर्यंत दिड टक्के पेरणी झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दीड टक्याने पेरणी कमी झाली आहे. मात्र घाबरण्याचे काही कारण नाही. पुढील चार ते पाच दिवसात पाऊस पडेल अशी आशा वाटते. यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse)यांनी केले.कोल्हापुरात (Kolhapur) पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्य़ांनी विधानपरिषद निवडणुकीत महाविकासआघाडी 100 टक्के विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यव्यापी आढावा घेतला तर 28 तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अशाठिकाणी दीड टक्के पेरणी झाली आहे. ज्या ठिकाणी पेरणी झाली आहे. अशाठिकाणी दुबार पेरणी घेण्यास काही अडचण येणार नाही.गेल्या वर्षी यादरम्यान 3 टक्के पेरणी झाली होती. मात्र घाबरण्याचे काही कारण नाही. पुढील चार ते पाच दिवसात पाऊस पडेल आणि आमचा शेतकरी राजा सुखावेल असेही ते म्हणाले.