Uncategorized

महाराष्ट्रातील या भागात आज जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस ! अवकाळी पावसाने शेतकरी धास्तावले

महाराष्ट्रातील या भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस ! अवकाळी पावसाने शेतकरी धास्तावले

सोलापूर : येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही भागात गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाच्या शक्यतेचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भात जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ७ एप्रिलपर्यंतचा हवामानाचा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD) मार्फत वर्तवण्यात आला आहे.

कोणत्या भागात पावसाचा अंदाज ?
कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात येत्या ५ एप्रिल रोजी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच दिवशी सातारा, कोल्हापूर या भागातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच ६ एप्रिल रोजीही याच भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गुरूवारी ७ एप्रिलला जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूर, सातारा या भागात पावसाची शक्यता या दिवशी वर्तवण्यात आली आहे.

हातातोंडाशी आलेला घास ऐनवेळी हिरावण्याची भीती अवकाळी पावसाच्या येण्यानं आता शेतकऱ्यांना (Farmers in Maharashtra) लागून राहिली आहे. वाढलेल्या तापमानात अचानक पाऊस झाल्यानं वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. यामुळे सोलापूर शहरातील नागरीक सुखावले आहे. दरम्यान, हायवेवर मात्र अचानक आलेल्या पावसानं अनेकांची तारांबळ उडवली आहे.

एकीकडे राज्यात तापमान (Heat in Maharashtra) वाढलंय. तर दुसरीकडे सोलापुरात वादळी वाऱ्यासह (Unseasonal Rain in Solapur) जोरदार पावसानं हजेरी लावली. सोलापूर शहराजवळच्या कुंभारी गावावमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. अचानक आलेल्या पावसानं सगळ्यांचीच तारांबळ उडवली होती. सोलापुरात झालेल्या या अवकाळी पावसामुळे काढणीच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरीही धास्तावले आहे.

कुठं कुठं पावसाची हजेरी?
सोलापूर जिल्ह्यात रविवारी संध्याकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, रात्रीच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह कुंभारी आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे काढणीला आलेली पिकं नासण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

कुंभारीसोबत सोलापूर अक्कलकोट मार्गावरही पावसानं हजेरी लावली. उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यातही पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळे द्राक्ष पिकं, काढणीला आलेला कांदा, काढलेली ज्वारी या पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे अवकाळीच्या हजेरीनं शेतकरी हवालदिल झाले आहेत.

उस्मानाबादेतही अवकाळी पावसाची हजेरी
उस्मानाबाद जिल्ह्यामध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. लोहारा तालुक्यात काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे. अवकाळी पाऊस पडल्याने ज्वारी पिकाचे नुकसान होण्याची शक्यताय. भर उन्हाळ्यात पाऊस पडल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. वातावरणातील अनियमित बदलाचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना वारंवार बसत असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलेत.

40 डिग्री सेल्सिअस तापमान आता सामान्य बाब

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सरासरी तापमानाचा पारा हा ४० डिग्री सेल्सिअस इतका पोहचला आहे. अशातच मार्चच्या तुलनेत एप्रिल महिना हा अधिक उष्ण असू शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नुकताच संपलेला मार्च २०२२ महिनादेखील अतिशय उष्ण असल्याचे समोर आले होते. त्यामुळे ४० डिग्री तापमान हे आता सामान्य झाले आहे, असे हवामान विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक ठिकाणी ४० डिग्रीपेक्षा अधिक कमाल तापमान असल्याचे भारतीय हवामान विभागाचे पुणे येथील वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button